- अनिकेत घमंडी डोंबिवली - मध्य रेल्वेच्या आगामी नवीन वेळापत्रकामध्ये उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेला काही बदल सुचवले आहेत, त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, टिटवाळा मार्गावर तसेच कर्जत, कसारा दिशेकडे लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना संघटनेचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की,महिलांसाठी सकाळी बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर/ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टिटवाळा अशा महिलांसाठी खास लोकल सोडाव्यात.तसेच महीलांच्या प्रथम श्रेणी व व्दितीय श्रेणीच्या डब्यांच्या (1st class) संख्येत वाढ करण्यात यावी. सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी ठाणे ते कसारा,कर्जत, टिटवाळा, बदलापूर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करावी. बदलापूरहून सकाळी ९: ३८ मिनिटाची लोकल गेल्यानंतर थेट १०:१८ मि. ची धीमी लोकल आहे दोन लोकल मधील ४० मि.अंतर आहे.तसेच १२: :०० मि.धीमी लोकल सुटल्यानंतर दुपारी १३:५९ ची कर्जत ते ठाणे धीमी लोकल आहे, ही लोकल गेल्यानंतर थेट २०:२४ मि.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी धीमी लोकल आहे,ज्या प्रवाश्यांना मधल्या स्थानकावर जायचे असल्यास एकतर डोंबिवली किंवा ठाण्याला उतरून दुसरी लोकल पकडावी लागते तरी हया दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा ठाणे साठी धीम्या लोकल सोडण्यात याव्यात.
परेल,दादर परिसरात रुग्णालये,खाजगी कंपन्या बऱ्याच आहेत.संध्याकाळी ४ वाजता कामावरुन सुटणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे,तरी संध्याकाळी दादर ते बदलापूर ४:१३ मि.सुटणाऱ्या लोकलची वेळ बदलून ४:२५ मि.करण्यात यावी अशी विनंती केली होती परंतु ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन दुपारी ३:.३९ मि.केली आता ही लोकल दादरला दुपारी ३:५४ मि.येते.(पूर्वी ही लोकल दादर वरुन दुपारी २:१३ मि.सुटत होती, त्या लोकलचा चार वाजता सुटणाऱ्या कर्मचाऱ्याना काहीच फायदा होत नाही,ही लोकल गेल्यानंतर दादरला कर्जत लोकल ५० मि.म्हणजे संध्याकाळी ४:४३ मि.आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन दुपारी ४:३५ मि.कर्जत लोकल आहे व लगेच चार मिनिटांनी ३:३९ मि.बदलापूर लोकल आहे.फक्त चार मिनिटांचा फरक आहे. तरी जी बदलापूरसाठी सुटणारी लोकलची तिची वेळ ४:०० किंवा ४:३९ मि.ते ४: ३० मि.हया दोन लोकलच्या दरम्यान एक लोकल बदलापूर किंवा कर्जतसाठी सोडावी.
अलिकडे कर्जत स्थानकामध्ये थांबणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द केलेत.रद्द केल्यामुळे गरोदर महिला,ज्येष्ठ नागरीक,पर्यटक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणच्या पुढील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापूर,वांगणी येथून पुण्याला जाणारे सरकारी निमसरकारी कर्मचारी,व्यापारी बरेच आहेत कर्जतला मेल-एक्सप्रेस थांबत नसल्यामुळे कल्याणला जावे लागते.तरी सर्व मेल-एक्सप्रेस गाड्यांना कर्जतला थांबा देण्यात यावा जेणेकरून वेळ व होणाऱ्या त्रासातून मुक्तता होईल व प्रवास सुखकर होईल. कर्जत ते वासी-पनवेल,कसारा ते वासी-पनवेल (व्हाया कल्याण ) लोकल चालू करावी. प्रवासी विरुद्ध प्रवासी संघर्ष टाळण्यासाठी लांब पल्याच्या कर्जत, खोपोली, कसारा, आसनगांव, बदलापूर, टिटवाळा या लोकलना सकाळी व संध्याकाळी गर्दिच्या वेळी दिवा स्थानकामध्ये थांबा देऊ नये.जेणेकरून प्रवाश्यांमध्ये होणारा संघर्ष टळेल, आदी पर्याय त्यांनी सुचवले आहेत. रेल्वे प्रशासनाने।देखील त्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल असा प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले.