ठाणे : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा वाढविला आहे. तसेच शहरातील इतर राजकीय तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवसास्थानबाहेरील बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांबाहेरही पोलिसांनी कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरील सेवा रस्ता पूर्णपणे बंद केल्याने नागरिकांना वळसा घालून वाहतुक करावी लागत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे राज्यभरात काही राजकीय मंडळींच्या घराची जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी राज्य परिवहन सेवेच्या बस जाळण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे हे ठाण्यात आले असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्नही झाला होता. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. तसेच मंत्री उदय सामंत, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक यांच्यासह काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्यास आहे. त्यामुळे पोलीस दल सतर्क झाले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर याठिकाणी वागळे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला. येथील सेवा रस्ताही बंद करण्यात आला. त्यामुळे नितीन कंपनी येथून सेवा रस्त्याने लुईसवाडी, तीन हात नाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना फेरा मारून प्रवास करावा लागला. या भागातील रहिवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली.
तसेच ठाण्यातील आमदार, खासदार आणि इतर काही महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींच्या घराबाहेरही पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले. पोलिसांचे गस्ती वाहनही फिरत होते. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे याठिकाणीही बंदोबस्त वाढविण्यात आला.