सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर आचारसंहिता भरारी पथकाने चेक पोस्टच्या तपासणीत जप्त केलेल्या रक्कमच्या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता, ८५ हजाराची अपरातपर केल्याचा प्रकार उघड झाला. तब्बल १३ दिवसांनी पथकाच्या ५ कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्यावर बडतर्फेची कारवाईचे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.
उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता पथक क्रं-६ च्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे फुल उत्पादक व्यापारी बबन आमले व त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून अहमदनगर व पुणे येथील शेतकऱ्यांना फुल उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकी जवळ त्यांची गाडी अडवून तपासणी केली. तपासणीत त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम सापडली. यानंतर पथकप्रमुखांनी आमले आणि शिंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविल्यावर, त्यांनी पैश्याच्या पावत्या दाखवून पैसे वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्यांनी जप्त केलेल्या रक्कमे पैकी ८५ हजार रुपये कोणतीही कारवाई न करता उकळण्यात आले. याप्रकरणी आमले व शिंदे यांनी तक्रार करूनही सदर प्रकार उघडकीस यायला १३ दिवस लागले.
उल्हासनगर मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद व पोलीस अधिकाऱ्यांकडे मीडियाच्या माध्यमानी विचारणा केल्यानंतर, कारवाई सुरू झाली. अखेर उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि विधानसभेचे आचारसंहिता पथक प्रमुख सुनिल लोंढे यांच्या फिर्यादीवरून पथकातील पाच जणांविरुद्ध खंडणी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले. ५ पैकी ३ कर्मचारी महापालिकेचे असून २ कर्मचारी पोलीस आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी पथकातील दोषी पाचही कर्मचाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले.
निवडणूक आचारसंहिता पाथकाने केलेल्या प्रत्येक कारवाईचे तपासणीचे चित्रीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले नसून पोलिसांनी या कृत्यावर पडदा टाकला असल्याचे उघड झाले. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांच्यावर बडतर्फ कारवाई योग्य असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे.