उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या पाठपुराव्याला यश येऊन १५० कोटीच्या निधीतून मुख्य ६ रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून एमएमआरडीएने रस्त्याच्या निविदा काढल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. याव्यतिरिक्त ५५० कोटीच्या निधीतून रस्ते, नाल्या, पायवाट आदी कामे प्रस्थावित आहेत.
उल्हासनगरातील संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. सद्यस्थितीत शहरातील ६० टक्के पेक्षा जास्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. एमएमआरडीएने शहरातील मुख्य ६ रस्त्यासाठी १५० कोटीच्या निधीला मंजुरी देऊन रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी पाठपुरावा केला असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या निविदा निघाल्याचे बोलले जात आहे. तसेच सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत २४३ कोटीतून १६ रस्ते, नाल्या, पायवाटा तसेच विशेष निधीतून १७ रस्ते असे एकून ५५०कोटींची विविध कामे राज्य शासनाकडे प्रस्तावित आहेत. यातील बहुतांश कामाला मंजुरी मिळाल्यास, रस्ते चकाचक होणार आहेत.
महापालिका रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. रस्त्याची बांधणी झाल्यास, रस्त्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च वाचणार आहे. असे आयुक्त शेख यांचे म्हणणे आहे. शहर विकास कामे वेळेत होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नवीन वर्षापूर्वी बहुतांश विकास कामे मार्गी लागणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. आयुक्त अजीज शेख यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर, महापालिका विकास कामाला गती आली असून मालमत्ता कर विभागातून कर उत्पन्न मिळण्यासाठी अभय योजना लागू केली. एकूणच रस्ते कामाला मंजुरी मिळाल्यास येत्या वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली.