उल्हासनगर : एमपीडिए गुन्ह्यातून बाहेर आलेल्या नवीन केसवानी व त्याच्या मित्राने गुरवारी रात्री ९ वाजता सोहन याला जबरीने बुलेट गाडीवर बसवून धीरज वलेच्छा याला बोलावून आणण्यास नकार दिल्याने जिवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर सोहमने फिनाईल पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील माजी नगरसेवक चैनानी यांच्या घरा जवळ सोहम गुरुवक्षसिंघानी हा तरुण मित्रा सोबत गुरवारी रात्री ९ वाजता बोलत उभा होता. त्यावेळी एमपीडिए गुन्हयातून बाहेर आलेला नवीन केशवानी हा मित्रांसोबत बुलेट गाडीवरून जात होता. केशवानी याने बुलेट गाडी थांबवून सोहम याला जबरदस्तीने गाडीवर बसून २५ सेक्शन परिसरात नेले. तेथे नेल्यावर धीरज वलेच्छा याला बोलावून आणण्यास सांगितले. त्यास सोहम याने नकार दिल्यावर मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकारने घाबरलेल्या सोहन याने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून नवीन केशवानी मला जिवेठार मारणार असल्याचे सोहम याचे म्हणणे आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सोहम याच्या तक्रारीवरून नवीन केशवानी व त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल झाला. केशवानी याच्यावर यापूर्वी एमपीडिए अंतर्गत कारवाई झाली असून तो शिवसेना शिंदे गटाच्या एका विभाग प्रमुखाचा खास मानला जातो. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडी येथील एका कार्यक्रमात ठाणे जिल्हा बंदी असलेल्या उल्हासनगरच्या एका नामचीन गुंडा सोबत फोटो व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेलिंग करणारी तरुणी अनिष्का जयसिंगानी ही उल्हासनगर मधील आहे. याप्रकारने राज्यात खळबळ उडाली आहे.
त्यापाठोपाठ एमपीडिए गुन्हात बाहेर आलेल्या नवीन केशवानी यांचे शिवसेना शिंदे गटाच्या व गुन्हेगारी पाश्र्वभूमीवर असलेल्या विभागप्रमुखाचा खास असल्याच्या चर्चेने शहरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले. याप्रकरणी केशवानी याला अटक करून पुन्हा एमपीडिए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.