सदानंद नाईक , उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी गुरवारी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन, उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोताच्या माहिती घेऊन उत्पन्ना बाबत नाराजी व्यक्त केली. आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया या लोकमत बातमीची आयुक्तांनी दखल घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
उल्हासनगर महापालिकेला मालमत्ता व पाणीपट्टी कर, एलबीटी अंतर्गत शासन अनुदान, नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना उत्पन्न आदी प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी अधिकाऱ्यांसह विभाग प्रमुखांची बैठक बोलाविली होती. बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, प्रभारी कर निर्धारक संकलक निलम कदम, सहायक आयुक्त अजय साबळे, मयुरी कदम, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दिपक ढोले, सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे यांच्यासह सचिन वानखेडे, मनोज गोकलानी, विजय मंगलानी आदी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून महापालिका उत्पन्नाची माहिती घेऊन नाराजी व्यक्त केली.
महापालिका क्षेत्रात एकुण मालमत्ता १ लाख ८३ हजार ५५० करयुक्त मालमत्ता असून त्यापैकी १ लाख ३६ हजार ५४३ मालमत्ता निवासी क्षेत्रातील आहेत. तर अनिवासी मालमत्तेची संख्या ४७ हजार असुन एकून थकबाकीची ८१९ कोटी १८ लाख ९८ हजार ४५५ आहे. तर चालु मागणी ११७ कोटी ८० लाख ९४ हजार ४३ आहे. एकुण चालू वर्षाची थकबाकी ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ आहे. यावर्षी एप्रिल पासून आजपर्यंत ६१ कोटी ६७ लाख ३७ हजार ८०१ वसुली मालमत्ता कराची झालेली आहे. त्याबद्दल आयुक्त ढाकणे यांनी नाराजी व्यक्त केली असुन थकबकीदार यांचेविरुध्द कडक वारवाई करण्याचे आदेश दिले. थकबाकीधारकांना वॉरंट बजावणे, मालमत्तेची जप्ती करणे, अटकावणी करणे यासह इतर आवश्यक कारवाई करुन करवसुली वाढीसाठी संबंधित अधिका-यांना विविध सूचना आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेने थकबाकीधारकांचे धाबे दणाणले असून ऐन सणासुदीच्या व निवडणूक काळात कारवाई नको. अशी भूमिका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.