सदानंद नाईक
उल्हासनगर : लोकसभा निवडणुक आचारसंहितेत शहर वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ७ जणांवर कारवाई केली. त्यापैकी दंड ना भरणाऱ्या ५ जणांना जेलची हवा खावी लागल्याची माहिती वाहतूक विभागाचे अधिकारी अविनाश भामरे यांनी दिली आहे.
उल्हासनगरात दारू पिऊन वाहने चालवीत असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाला मिळाली होती. विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी निवडणूक आचारसंहिता अंतर्गत ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ७ जणांवर गेल्या शनिवारी व रविवारी कारवाई करून, प्रत्येकी १० हजाराचा दंड ठोठावला. ७ पैकी ५ जणांनी दंड न भरल्याने, त्याची जेलमध्ये रवानगी झाली.
शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांच्या आदेशान्वये, सहायक पोलीस आयुक्त विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक पोपट करडकर, पोलीस कर्मचारी नाना आव्हाड, भारत खांडेकर, संजय बेंद्रे, नितेश आरज यांच्या पथकाने शहरातील प्रवेशद्वारांसह मुख्य चौकात नाकाबंदी केली. गेल्या शनिवारी व रविवारच्या नाकाबंदीत ७ जणांना मदधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
भारतीय मोटर वाहन कायद्यातील कलम १८५ नुसार तर दारू पिऊन मागे बसणाऱ्याच्या विरोधात कलम १८८ नुसार कारवाई केली. २२ एप्रिल रोजी अटक केलेल्या ७ जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी ५ जणांनी दंड न भरल्याने, त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती अविनाश भामरे यांनी दिली आहे.