उल्हासनगर - शहरातील संच्युरी मैदानात बुधवारी रात्री पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत अनेकांची पाकिट चोरीला गेल्याने, पोलीसही चक्रावून गेले. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांचे सुंदर नियोजन असतानाही चोरट्यांनी आपला डाव साधून अनेकांची खिसे रिकामे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या गर्दीचा फायदा पाकिट चोरांनी घेतला. अनेकांची पाकिट चोरीला गेले असल्याचे उघड झाले. भाजपाचे माजी नगरसेवक प्रकाश नाथांनी, भाजप पदाधिकारी अनिल सिन्हा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नाथांनी यांचे पैशासह ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कोरे चेक व इतर कागदपत्र पॉकेट मध्ये असल्याचे सांगितले. तर सिन्हा यांचे ३५ हजार रुपयांचे चोरी झाल्याचे सांगितले. असंख्य जणांचे पाकिटमधील हजारो रुपये चोरीला गेले. मात्र पोलीस त्रास नको म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
मुख्यमंत्री यांच्या सभेतील व्हीआयपी कक्ष प्रवेशासाठी महापालिकेने सन्मानीय पक्ष नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, पाहुणे आदींना पासेस दिली. व्हीआयपी कक्षात प्रवेश देण्यापूर्वी दोन वेळा पोलिसांकडून तपासणी झाली. असे असताना व्हीआयपी कक्ष व मुख्यमंत्री असलेल्या मुख्य स्टेजवर कडक पोलीस बंदोबस्त असतांना चोरटे घुसलेच कसे? असा प्रश्न विचारला जात आहे. सभेत चोरट्यांची चांदी झाली असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रात्री १० वाजल्यानंतर सुरू झाल्याने, आयोजक असलेल्या महापालिकेवर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
काँग्रेसचा सभेवर आक्षेप
महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री आले होते. मात्र सभेतील स्टेजवरील वातावरण, सभेचे नियोजन एका विशिष्ट पक्षासाठी असल्याचा भास निर्माण झाला होता. असा आरोप काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. महिन्याला महापालिका कर्मचाऱ्याचा पगार वेळेत न देणाऱ्या महापालिकेने लाखो रुपये उदघाटन व लोकार्पण सोहळ्यावर उधळणे बरोबर आहे का? असा प्रश्नही साळवे यांनी उपस्थितीत केला.