उल्हासनगर : शहरातील ३ कोटीच्या निधीतील रामदेवनगर ते म्हारळ नाका रस्त्याचे भूमिपूजन रविवारी पप्पु कलानी यांच्या पाठोपाठ रिपाईचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते झाले. रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी कलानी व रिपाई आमने सामने आले असून भालेराव यांनी उपमहापौर पदावर असतांना रस्त्याला मंजुरी दिल्याची माहिती दिली.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक होणार असून यापूर्वी रस्ता बांधणीला मंजुरी मिळाल्या आहेत. रस्त्याच्या भूमिपूजनावरून राजकीय पक्ष श्रेय घेण्यासाठी आमने सामने आल्याचे प्रकार घडत आहेत. रविवारी कॅम्प नं-१ मधील रामदेवनगर ते म्हारळ नाका दरम्यानच्या रस्त्याला महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव असतांना मंजुरी देण्यात आली. ३ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्यां रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार पप्पु कलानी यांच्या हस्ते झाले. प्रभाग क्रं-७ मधून निवडून आलेल्या शुभांगी निकम यांच्या प्रयत्नाने रस्त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती कमलेश निकम यांनी यावेळी दिली.
उपमहापौर पदाच्या काळात जनरल निधीतून रामदेवनगर ते म्हारळ नाका रस्ता बांधणीला मंजुरी मिळाल्याची माहिती माजी उपमहापौर व रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी दिली. तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन केले. रस्त्याच्या कामाचे कोणी श्रेय घेवू नये. प्रभागात विकास कामे करण्यास वाव असून त्या विकास कामाला आयुक्तांकडून मंजूरी आणावी. असा टोला पप्पु कलानी यांच्या समर्थकांना भालेराव यांनी लावला. माझ्या उपमहापौर व नगरसेवक निधीतून झालेल्या कामाचा दर्जा तपासावा व इतरांनी केलेल्या कामाचा दर्जा तपासावा. असे सूचक वक्तव्य भालेराव यांनी करून रस्त्याच्या दर्जा तपासण्याचा चेंडू आयुक्त अजीज शेख यांच्या कोर्टात टाकला. एकाच रस्त्याचे भूमिपूजन पप्पु कलानी यांच्या हस्ते व त्यानंतर रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते झाल्याने, निवडणुकी पूर्वीच कलानी व भालेराव आमने सामने आल्याचे चित्र शहरात आहे.
शासनाचा दलित वस्तीचा निधी पडून? महापालिका अंतर्गत येणाऱ्या दलित वस्तीतील विकास कामे होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी पडून असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दलीत वस्तीतील कामे व निधी महापालिका आयुक्तांनी प्रसिद्ध करून पारदर्शकपणा दाखवावा. असे आवाहन माजी उपमहापौर भालेराव यांनी केले. तसे झाल्यास मोठा भष्ट्राचार उघड होणार असल्याचे ते म्हणाले.