उल्हासनगर : महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गतबाजीला ऊत आल्याने, कंत्राटी कामगाराच्या वेतनावर ठेकेदाराला डल्ला, सुरक्षा रक्षकांनी गेल्या तीन वर्षात एकही सुट्टी न घेणे, बोगस कर्मचारी, रस्त्याची दुरावस्था आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत.
उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने, मूलभूत सुखसुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकून ८३ सुरक्षा रक्षकांनी एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका सुरक्षा रक्षकाने लग्न असतानाही त्याला महापालिका सेवेत हजर दाखविण्यात आले. तर अनेक जणांनी तीन वर्षात रुग्णालयात उपचार घेऊनही आल्यावरही कामावर हजर असल्याची नोंद आहे. हे कमी म्हणून की काय, नगररचनाकार विभागात वर्षानुवर्षे बोगस कर्मचारी काम करीत असल्याचे उघड झाले. रस्ता बांधणी, कोट्यवधींकिमतीचे साहित्य खरेदी करूनही, महापालिका रुग्णालयाचे खाजगीकरण, रस्त्याची दुरावस्था, महापालिका शाळा मैदानावर खाजगी संस्थेला दिलेली सनद, शहरातील खुल्या व विविध शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद, आरसीसीची अवैध बहुमजली बांधकामे, पाणी टंचाई, डम्पिंगचा प्रश्न आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या असतांना प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या गटबाजी निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे गंगोत्री यांनी केला आहे.
महापालिकेत प्रशासकीत राजवट असल्याने, माजी नगरसेवक, सतर्क नागरिक महापालिका मुख्यालयात जाऊन विकास कामाचा जाब विचारात नसल्याने, प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. दरम्यान अधिकाऱ्यांत गटबाजी निर्माण होऊन कर्मचाऱ्यांची विभागणी अधिकाऱ्यांत होऊ लागल्याने, महापालिकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच चलती है क्या बाहेर? असे प्रकार घडत आहेत. एकूणच महापालिकेचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून, त्याजागी नवीन अधिकारी पाठविण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांनी दिली आहे. प्रतिनियुक्तीचा काळ संपूनही ठाण -महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिकाऱ्याचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपूनही ठाण मांडून बसले आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविण्यासाठी अनेक अधिकारी मंत्रालयाचे व नेत्यांचे उंबरठे झिजवीत आहेत. काही अधिकारी यामध्ये यशस्वी झाले असून त्यांनी चिरीमिरी दिल्यानेच, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविल्याने बोलले जात आहेत.