उल्हासनगर : दिवाळी सणा दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महापालिका अतिक्रमण विभागाने फुटपाथवर ठेवलेल्या साहित्यावर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईला विरोध झाल्याने, व्यापारी व पालिका कर्मचाऱ्यांत राडा झाला. आक्रमक व्यापारी व राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर जप्त केले साहित्य परत द्यावे लागले.
उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक परिसरात कपड्यासाठी जपानी व गजानन मार्केट प्रसिद्ध असून होलसेल फटाक्याची दुकाने आहेत. तसेच दिवाळीची लायटिंग व सजावटीच्या साहित्यासह फर्निचर खरेदी करण्यासाठी कर्जत, कसारा, कल्याण, ठाणे, ग्रामीण परिसर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड व शहापूर आदी भागातून शेकडो नागरी शहरात खरेदीसाठी येतात. त्यामुळे मार्केट मध्ये गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी बहुतांश दुकानदारांनी थेट फुटपाथवर साहित्य विक्रीसाठी ठेवल्याने, नागरिकांना येण्या-जाण्याचा त्रास होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. तसेच नागरिक व वाहनचालक हैराण झाले. यावर उपाय म्हणून महापालिका अतिक्रमण विभागाने बुधवारी सायंकाळी साडे पाचनंतर फुटपाथवर अतिक्रमण करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर धडक कारवाई केली.
महापालिकेच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने, काही व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरून व्यापारी संतप्त होऊन त्यांनी महापालिकेच्या गाडी समोर ठिय्या आंदोलन करून ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्यांना सोडण्याची विनंती केली. तसेच दिवाळी सणा दरम्यान कारवाई करू नये. अशी मागणी केली. व्यापारी संघटनेचे नेते दिपक छतलानी यांनी महापालिका प्रशासन, पोलीस व व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून व्यापाऱ्यांचा जप्त केलेले साहित्य परत देण्याची मागणी केली. युवानेते ओमी कलानी यांनीही व्यापारी व महापालिका अतिक्रमण विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्यात मध्यस्थी केल्याने, वातावरण निवळले. अखेर महापालिकेने पथपतवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कारवाई थांबविली. ओमी कलानी व दीपक छतलानी यांनी रस्त्याच्या पदपथवर साहित्य ठेवू नका. असे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे.