सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे शासन धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी केला. परिपत्रक प्रसिद्ध न केल्यास शहर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे.
उल्हासनगरात गेल्या १५ दिवसात कोमल पार्क, साईसदन व मानस इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा बळी गेला. तर गेल्या वर्षी इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचे बळी गेले होते. इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा पंचम कलानी यांनी व्यक्त केला. गेल्यावर्षी धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, तत्कालीन नगरविकासमंत्री व आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती नेमून एका महिन्यात समिती अहवाल देणार असल्याचे सांगितले होते. या घटनेला एका वर्षाचा कालावधी लोटला आहे. झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीचा अहवाल मिळाला असून एका आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र अध्यापही निर्णय झाला नसल्याने, धोकादायक व जुन्या इमारती मध्ये राहणारे हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. असे मतही कलानी यांनी व्यक्त केले.
शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी होण्याचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी व अवैध बांधकामे नियमित करण्याबाबत समितीच्या अहवालानुसार परिपत्रक काढण्याची मागणी कलानी यांनी केली. परिपत्रक एका आठवड्यात प्रसिद्ध केले नाहीतर, राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. शहरात सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक धोकादायक इमारती बाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी करीत आहेत. कलानीच्या मागणीने त्याला जोर पकडला आहे.