उल्हासनगर : चंपीकेम मल्टी ट्रेंड कंपनीत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून हासो कटारिया यांची १२ लाख ८४ हजाराने फसवणूक केल्याची प्रकार उघड झाला. याप्रकरणी ५ जणांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, वराही माता मंदिर २६ सेक्शन येथे हासो भोजराज कटारिया कुटुंबासह राहतात. त्यांच्या ओळखीचे मनोज तिवारी, मनीष तिवारी, छाया तिवारी, सुमित एम सिंग व संजय सेजपाल यांनी चंपीकेम मल्टी ट्रेंड प्रा. ली. या कंपनीत पैसे गुंतविण्याचे व कंपनीत डिस्ट्रिबुटरशिप व सुपर स्टोकिस्ट म्हणून घेण्याचे आमिष दाखविले.
कटारिया यांनी १२ लाख ८४ हजार ६८० रुपये गुंतविल्यावर, कंपनी कार्यालयात गेले. तेंव्हा त्यांना तेथून हाकलून देण्यात आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी मनोज तिवारी, मनीष तिवारी, छाया तिवारी, सुमित एम सिंग व संजय सेजपाल यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.