सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील रस्ते दुरुस्तीवर मनसेने प्रश्नचिन्हे उभे करून डांबरी रस्त्यात डांबर वापरत नसल्याचा प्रकार उघड केला होता. त्यानंतर रस्ते दुरुस्तीला वेग आला असून रस्ते चकाचक झाल्याचे चित्र शहरात आहे. उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटीची तरतूद केली होती. मात्र पावसाळ्या पूर्वी काही अपवाद सोडल्यास रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डेच भरले नव्हते.
परिणामी पावसाळ्यात रस्त्यात खड्डेच खड्डे झाले. रस्त्याच्या दुरावस्था बाबत सर्वत्र ओरड झाल्यावर महापालिकेने रेती, दगड व सिमेंट मिक्सर करून रस्त्यातील खड्डे भरण्याचा केवलवाणा प्रयत्न केला. मात्र दिवाळी दरम्यान पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्यावरही महापालिकेने रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरवात केली नाही. मात्र काही ठिकाणी मात्र डांबरीकरण झाले होते. मात्र त्यामध्ये डांबरीकरण झालेल्या रस्त्यात डांबर नसल्याने रस्ता हाताने उखळला जात असल्याचा प्रकार मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी उघड केला. तसेच रस्त्यातील डांबर चोरीला गेल्याचे निवेदन सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांना देऊन खळबळ उडून दिली.
अखेर महापालिका सार्वजनिक विभागाने गेल्या तीन दिवसांपासून रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. गेल्या तीन दिवसात रस्ते चकाचक झाल्याचे चित्र शहरात असून रस्ता दुरुस्ती कोणत्या निधीतून करण्यात आली. असा प्रश्न नागरिकांना पडला. शहर पूर्वेतील रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम प्रगती पथावर तर शहर पश्चिम मधील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे परिपत्रक महापालिका बांधकाम विभागाने काढण्यात आले. याबाबत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांना याबाबत संपर्क केला असता झाला नाही.