सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-५ नेताजी चौक ते लालचक्की चौक रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होत असलेल्या ३९ दुकानावर महापालिका अतिक्रमण पथकाने बुधवारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. या कारवाईने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या दुकानावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ६ रस्त्याची पुनर्बांधणी होत आहे. शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणात बाधित दुकाने व घरांना प्रभाग समितीच्या वतीने नोटिसा देऊन कारवाईचे संकेत दिले आहे. कॅम्प नं-५ येथील नेताजी चौक ते लालचक्की चौक रस्त्याचे पुनर्बांधणीचे काम महापालिकेने सुरू केले असून रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या दुकानांना महापालिका प्रभाग समितीच्या वतीने नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही व्यापाऱ्यांनी दुकाने खाली केली नोव्हती. अखेर बुधवारी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात जेसीबी मशीनद्वारे तब्बल ३९ दुकाने जमीनदोस्त केली असून या कारवाईवर स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिका अतिक्रमण पथकाने यापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या हिराघाट, पवई चौक, नेताजी चौक ते भाटीया चौक व नेताजी।चौक ते लालचक्की चौक येथील शेकडो दुकाने व घरावर पाडकाम कारवाई केली. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतील ६ मुख्य रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून रस्त्याचे काम शहर विकास आराखड्यानुसार करण्याची मागणी होत आहे. तसेच महापालिका व शासनाच्या विविध निधीतून रस्त्याची कामे जैसे थे होत असल्याने, या कामावर टीका होत आहे. ही कामेही शहर विकास आराखड्यानुसार करण्याची मागणी होत आहे. तर रस्ता रुंदीकरणात बाधित दुकानांना पर्यायी जागा देण्याची मागणी व्यापारी संघटनेसह राजकीय पक्षाचे नेते करीत आहेत.