उल्हासनगर : शहरातील कोणार्क बँकेत निवृत्ती वाकुरले यांच्या पॅनकार्ड व रेशनकार्डचा वापर करून, एका अज्ञात व्यक्तीने दोन कंपनीच्यां नावाने बँक खाते उघडून ३ वर्षात ४२ कोटीचा व्यवहार केला. मात्र त्यावरील ४६ लाख २३ हजार ६०० रुपयांचा आयकर बुडून शासन व निवृत्ती वाकुरले यांची फसवणूक केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ शिरू चौकात असलेल्या कोणार्क को ऑ बँकेत एका अज्ञात इसमाने निवृत्ती बाळाराम वाकुरले यांच्या नावाचे पॅनकार्ड व रेशनकार्ड सारख्या कागदपत्राचा वापर करून व बनावट सह्या करून सन-२०१४ साली हरी ओम टेक्स्टाईल व तुळसी टेडर्स नावाच्या दोन बनावट कंपन्यांचे खाते उघडून व्यवहार सुरू केले. सन-२०१४ ते २०१७ दरम्यान बँक खात्यात ४१ कोटी ९१ लाख ८६ हजार १८० रुपयांचे बेहिशोबी व्यवहार केले. मात्र या आर्थिक व्यवहारावरील ४६ लाख २३ हजार ६०० रुपयांची आयकर रक्कम शासनास अदा करणे आवश्यक होती. मात्र शासन व निवृत्ती बाळाराम वाकुरले यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला.
या प्रकरणातील तक्रारदार निवृत्ती बाळाराम वाकुरले यांच्या कागदपत्रांचा व बनावट सहीचा वापर करून, अज्ञात एका व्यक्तीने बनावट कंपनीचे बँक खाते कोणार्क बँकेत उघडले. तसेच सन-२०१४ ते २०१७ दरम्यान ४२ कोटीचा आर्थिक व्यवहार करून शासनाचा ४६ लाखाचा आयकर बुडविल्याचा प्रकार उघड झाल्यावर, कोणार्क बँकेसह शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे यांनी दिली आहे