उल्हासनगर - शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह आजी, माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या महिन्यात चौधरी यांच्यासह १४ जणांवर आदिवासी महिलेची जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यानंतर, चौधरी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. उल्हासनगरात खऱ्या अर्थाने शिवसेना मोठे करण्याचे काम शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे जाते.
शिवसेनेत उभी फूट पडल्यावर चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटात राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. तसेच ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या विरोधात उल्हासनगर आघाडीवर होते. खासदार श्रीकांत शिंदे यांचे गोलमैदान जनसंपर्क कार्यालय तोडफोड प्रकरणी चौधरी गट आक्रमक होता. तसेच शिवसेना दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी चौधरी यांनी प्रत्येक शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिकांना जागृत केले होते. तसेच महाविकास आघाडीचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी विठ्ठलवाडी येथील सभागृहात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. तसेच शिवसेना शिंदे गटात जाणारे कट्टर शिवसैनिक नसून उपरे असल्याची टीका त्यांनी केली होती.
दरम्यान, राजेंद्र चौधरीसह काँग्रेसचे माजी नगरसेवक, हॉटेल व्यावसायिक आदी १४ जणांवर विठ्ठलवाडी येथील आदिवासी महिलेची जागा हडप केल्या प्रकरणी खंडणी, अपहरण असे १९ गुन्हे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करून पोलिसांनी चौधरी यांना ताब्यात घेतले होते. चौधरी यांना ताब्यात घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या शेकडो शिवसैनिकांनी मध्यरात्री पर्यंत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी गंभीर गुन्हे दाखल होऊनही चौधरी यांना पोलिसांना सोडल्यावर, सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. चौधरी यांनी दुसऱ्याच दिवशी समर्थकासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. याप्रकारने विविध चर्चेला उधाण येऊन चौधरी हे शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते.
चौधरी गट शिवसेना शिंदे गटात
राजेंद्र चौधरीसह त्यांच्या धर्मपत्नी माजी महापौर राजेश्री चौधरी, माजी नगरसेविका सुरेखा आव्हाड, सुमित सोनकांबळे, मंदाताई सोनकांबळे, नरेंद्र दवणे, विजय सुपाळे, दत्तात्रय पवार, धीरज ठाकूर, बाळा श्रीखंडे, संदीप गायकवाड, सुरेश सोनवणे, बाजीराव लहाने, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, जावेद शेख, पप्पू जाधव, समीर शेख, रवी निकम, शशिकला राजपूत, मनिषा राजपूत आदींनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.