सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ भाटिया चौक शेजारील स्वामी नारायण पॅलेस इमारतीचा तिसरा मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडण्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडली. सुदैवाने दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली असून सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने इमारत सील केली. तर इमारती मधील नागरिकांनी नातेवाईक व आश्रमशाळा येथे आश्रय घेतला आहे.
उल्हासनगरात इमारतीचें स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता कॅम्प नं-५ भाटिया चौकातील स्वामी नारायण पॅलेज इमारतीचा स्लॅब पडल्याची घटना घडली. गेल्या वर्षी विविध इमारतीचें स्लॅब कोसळून तब्बल १२ जणांचा बळी गेला. ४ मजल्याची स्वामी नारायण पॅलेस इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नाही. सन १९९६ साली इमारत बांधण्यात आली. इमारती मधील तिसऱ्या मजल्याचा बेडरूमचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडला. त्यावेळी दुसरा मजल्यावर कोणी राहत नोव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ज्या तिसऱ्या मजल्याच्या स्लॅब कोसळला. त्यावेळी बेडरूममध्ये चार जण बसले होते. तेही स्लॅब सोबत दुसऱ्या मजल्यावर कोसळले. मात्र ते किरकोळ जखमी झाले.
स्वामी नारायण इमारतीचा स्लॅब पडल्याची माहिती स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांना मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, इमारती मधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी महापालिका कर्मचारी व आमदार कुमार आयलानी घटनास्थळी धावून आले. इमारती मधील नागरिकांनी आपआपले मौल्यवान साहित्य बाहेर काढल्या नंतर मध्यरात्री इमारत खाली करून सील केली. इमारती मधील नागरिकांनी नातेवाईक तर काहींनी कुटुंबासह आश्रम शाळेत आश्रय घेतला. गेल्या वर्षी इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडून १२ जणांचा बळी गेल्यावर, अवैध व धोकादायक इमारती बाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती बनविली. मात्र समितीने अध्यापही ठोस निर्णय घेतला नसल्याने, नागरिकांत नाराजीचा सूर आहे. शासनाने पावसाळ्यापूर्वी ठोस निर्णय जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
डी फार्मच्या फाईल धूळ खात?
राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी ज्या मोजक्या नागरिकांनी १६ वर्षांपूर्वी पैसे भरले होते. त्यांना नियमानुसार डी फार्म देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र पैसे भरूनही डी फार्मच्या फाईल धूळखात पडून आहेत. दुसरीकडे डी फार्म देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली.