उल्हासनगर : कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबीघाट येथील शासकीय भूखंडावर अवैधपणे गाळा बांधणाऱ्या विरोधात प्रांत कार्यालयानं उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शासकीय भूखंड हडप करण्याचे प्रकार सुरू असून महापालिकेच्या एका शाळा मैदानावर सनद काढल्याचा प्रकार उघड झाला. मात्र त्यानंतर काय झाले. याबाबतची माहिती नागरीक महापालिकेला विचारीत आहेत.
उल्हासनगरातील खुले भूखंड, शाळा मैदाने, सार्वजनिक शौचालय, सामाजमंदिर, शासकीय जागा यांच्यावर भूमाफियांची नजर पडली असून त्यावर अतिक्रमण होत आहेत. कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर येथे शासकीय भूखंड असून त्यावर गाडी पार्किंगसाठी शेड बांधण्यात आले. यापूर्वी महापालिकेने वारंवार ताकीद देऊनही, अज्ञात व्यक्तीकडून पार्किंगसाठी शेड बांधण्यात आले.
अखेर ६ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान काशिनाथ मेंगाळ यांच्या तक्रारीवरून एका अज्ञात इसमा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. महापालिका शाळा मैदानावर सनद काढणाऱ्या विरोधात काय कारवाई झाली. याबाबतची माहिती उघड करण्याची मागणी यानिमित्ताने महापालिकेकडे होत आहे.