उल्हासनगर : महापालिकेने वृक्ष सर्वेक्षणाचे काम एका खाजगी ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले असून शहरात ३५ हजार पेक्षा जास्त झाडाची नोंदणी होणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या प्रमुख विशाखा सावंत यांनी दिली. तसेच धोकादायक झाडाचे सर्वेक्षण झाल्यावर त्यावर कारवाई करण्याचे संकेतही सावंत यांनी दिले.
उल्हासनगरात विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबी महापालिका परवान्या विना जुन्या झाडाची सर्रासपणे कत्तल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी शहरातील झाडाचे सर्वेक्षण करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार झाडाचे सर्वेक्षण एका खाजगी ठेकेदाराद्वारे करण्यात येत आहेत. आता पर्यंत ३० हजाराची नोंदणी झाली असून ३ ते ४ प्रभागातील झाडाचे सर्वेक्षण सुरू आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर शहरात ३५ हजार पेक्षा जास्त झाडाची नोंदणी होणार असल्याची माहिती विशाखा सावंत यांनी दिली. तसेच धोकादायक झाडाचे सर्वेक्षण करून त्याबाबत आयुक्त अजीज शेख लवकरच निर्णय घेणार आहेत. असे सावंत म्हणाल्या आहेत.
महापालिका पर्यावरण विभागाने झाडाच्या सर्वेक्षणानंतर, आहे त्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या झाडाच्या कत्तली बाबत तक्रारी आल्या आहेत, त्याची गुगल मॅपवर जाऊन, त्या ठिकाणी खरोखरच झाडे होती का? आदींची चौकशी करून झाडाची कत्तल करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी रोहित साळवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. तसेच शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीची अवस्था गटारगंगा झाली असून नदी पात्रात असंख्य अवैध बांधकामे उभी ठाकली. त्यावर महापालिका अतिक्रमण विभागाने नागरिकां हितासाठी कारवाई करण्याची मागणीही साळवे यांनी केली. पावसाळ्या पूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण झाले असतेतर, झाडे पडून होणारी हानी टळली असती. असेही साळवे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.