ठाणे: उल्हासनगरातील सेक्शन २६ परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी शनिवारी दिली. या दोघांच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
उल्हासनगरातील सेक्शन २६ जिजामल वाडयाजवळ एक महिला सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे चौधरी यांच्या पथकाने ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास जिजामल वाड्याजवळ सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी एका महिला दलाल आणि तिच्या पुरुष साथीदाराने दोन महिलांना शरीर विक्रयासाठी आणल्याचे एका बनावट गिऱ्हाईकाने दिलेल्या इशाऱ्यामुळे उघड झाले.
त्यानंतर या दोन्ही दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका केलेल्या दोन्ही पिडित महिलांना उल्हासनगरच्या महिला शासकीय सुधारगृहे वसतिगृहात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.