- सदानंद नाईक उल्हासनगर : स्टेशन परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातील जलवहिनीला लटकलेला कचरा सफाई कामगार जीव धोक्यात घालून काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारचा कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी निषेध करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी नदी पात्रातून जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिणीला नदीतून वाहणारा कचरा लटकत असून लटकलेले कचरा सफाई कामगारांनी कोणतेही सुरक्षेविना काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली. नदी दुथडी भरून वाहत असून अश्या वेळी नदीत एकदा कामगार पडून दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्न कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी केला. तर कचरा काढण्यासाठी सफाई कामगारांना कोणी पाठविले? असा प्रश्नही निर्माण झाला. याबाबत महापालिका आरोग्य विभाग प्रमुख यांना संपर्क केला असता, झाला नाही.
शहरातील लहान-मोठे नालेसफाईचा ठेका महापालिकेने देऊन त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला. मात्र उशिराने नालेसफाई सुरू झाल्याने, १०० टक्के सफाई झाले नाही. असा आरोप सर्वपक्षीय नेते करीत आहेत. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी गेल्या आठवड्यात ८० टक्के पेक्षा जास्त नालेसफाई झाल्याची प्रतिक्रिया देऊन नालेसफाई सुरू असल्याची माहिती दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेल्या नालेसफाईवर टीका झाली असून नदी व नाल्यातील कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे बोलले जात आहे. नालेसफाई मुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व आरोग्य विभागावर टीका होत आहे.