लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकाला आदळून मच्छीमार बोटीला अपघात झाला . अन्य मच्छीमार बोटींनी मदतीसाठी धाव घेत नाखवा व खलाशांना वाचवत अपघातग्रस्त बोट किनाऱ्यावर आणली .
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तनच्या राजेश फ्रान्सिस बेचरी यांची रॉक्सन हि मच्छीमार बोट मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असताना वाशी बेट ते गोडा बेट दरम्यान मोठ्या प्रमाणात असलेल्या खडकांवर आदळली . ओहोटी असल्याने सुकाणू धरणाऱ्या तांडेलला पाण्याचा अंदाज आला नाही .
बोटीला खालच्या बाजूने तडा जाऊन पाणी भरू लागल्याने नाखवा व खलाश्यानी अन्य मच्छीमार बोटींच्या नाखवाना संपर्क साधून अपघाताची माहिती दिली . अपघाताची माहिती मिळताच जवळपास असलेल्या दोन मच्छीमार बोटी मदतीसाठी धावल्या . अपघात झालेल्या बोटीवरील नाखवा व खलाशी यांना सुरक्षित करत सुपरस्टार व संत कार्लोस या दोन बोटींनी अपघातग्रस्त बोट दोरखंडाने बांधून किनाऱ्यावर ओढत आणली . क्रेनच्या सहाय्याने बोट समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"