ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच शुक्रवारी देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुकतांना संबंधितांना दिले. तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात २० पेक्षा जास्त फोनची सुविधा २४x७ कार्यान्वित आहेत. तसेच आलेल्या प्रत्येक फोनच्या तक्रारीचे निवारण पूर्ण होईपर्यत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नौपाडा- कोपरी परिसरातील पेढ्या मारुती मंदिर, वंदना सिनेमा परिसर, सिडको बस डेपो, चिखलवाडी, बारा बंगला, मेंटल हॉस्पिटल परिसर या ठिकाणच्या सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्याची कार्यवाही करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच कोपरी नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात परिमंडळ उपायुक्तांनी भेटी देवून सी १ आणि सी २ या धोकादायक व अतिधोकादायक इमारती रिकामी करण्याची कार्यवाही करण्यात आली.
वागळे प्रभाग समिती परिसरातील पडवळनगर, किसननगर, भटवाडी जनता झोपडपट्टी, श्रीनगर या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. तसेच अतिवृष्टीमुळे मुंब्रा परिसरातील खडी मशीन रोड व भीमनगर येथील रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची परिस्थिती नियंत्रणात आणून सदर ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे.