- पंकज रोडेकरठाण्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक असलेली शासकीय आरोग्यव्यवस्था कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे सद्य:स्थितीत ३६७ खाटांचे आहे. परंतु, शहरी आणि ग्रामीण भागांतून येणाºया गोरगरीब रुग्णांसाठी ते अपुरे पडत आहे. हे रुग्णालय लवकरच सुपरस्पेशालिटी होणार आहे. महापालिके च्या आरोग्यव्यवस्थेचा विचार केल्यास महापालिकेच्या ५२ आरोग्य केंद्रांची गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत २७ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. महापालिकेचे कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून ते ५०० खाटांचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्याचा आरोप वेळोवेळी केला जातो.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्याजागी नव्याने सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यानुसार, या रुग्णालयातील विविध विभागांची वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे. सद्य:स्थितीत, जिल्हा रुग्णालय ३६७ खाटांचे आहे. त्यासाठी रुग्णालयाला जवळपास ५२२ पदे मंजूर आहेत. त्यानुसार, सध्याच्या घडीला रुग्णालयात ४०४ पदे भरलेली आहेत. तर, मंजूर पदांपैकी रुग्णालयातील ११८ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने स्पेशालिस्ट डॉक्टरांची ११ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ असलेल्या श्रेणीत दोन डॉक्टरांची कमतरता आहे. तृतीय श्रेणीतील २६३ पैकी २९ आणि चतुर्थ श्रेणीतील २०३ पैकी ७६ पदे भरलेली नाहीत. चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. या रुग्णालयात दिवसाला साधारणत: एक हजार ते १२०० रुग्ण उपचारार्थ येत असल्याने ते बाराही महिने रुग्णांनी गजबजलेले असते. रुग्णांच्या नातेवाइकांना अंग टेकवण्यासाठी सोडाच, पण बसण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश रुग्णांचे नातेवाईक वॉर्डच्या बाहेर ताटकळत असल्याचे किंवा तेथे झोपल्याचे पाहण्यास मिळते.जिल्हा सामान्य रुग्णालयासह ठाणे शहरात ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. तेथेही रिक्त पदांची बोंबाबोंब आहे. तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयही आहे. हे रुग्णालयही ५०० खाटांचे असून, येथे २०१५ च्या मंजूर पदांची संख्या ७९० इतकी आहे. त्यापैकी जवळपास १०० पदे सद्य:स्थितीत रिक्त आहेत. या रुग्णालयातही बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांची संख्या १६०० ते १८०० इतकी आहे. दिवसेंदिवस या वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाºयांची संख्या कमी पडताना दिसत आहे. ती वाढवण्यासाठी आकृतीबंध प्रस्ताव प्रस्तावित आहे. मात्र, मनुष्यबळ अपुरे असल्याने काही पदांची कंत्राटी पद्धतीनेही भरती केली आहे. तरीसुद्धा, येथे मनुष्यबळाची गरज असल्याचे रुग्ण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ठामपाच्या हद्दीत सध्या २६ लाख लोकसंख्या आहे. शासनाच्या नियमानुसार ५० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र आवश्यक असल्याने लोकसंख्येच्या तुलनेत सद्य:स्थितीत ५२ आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात महापालिकेची एकूण २७ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे नियमानुसार २५ आरोग्य केंद्रांची गरज आहे. जी आरोग्य केंद्रे आहेत, ती सकाळच्या सुमारास सुरू असतात. त्यावेळेत तेथे बाह्यरुग्ण विभाग सुरू असतात. मात्र, सायंकाळच्या वेळेत आरोग्य केंद्रे बंद असतात. त्यातच, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी आरोग्य केंद्रे होणे गरजेचे असताना, जागेचे कारण पुढे करून ती उभी राहत नाही. मुंब्रा, कौसा आणि शीळ येथील लोकसंख्येसाठी दोनच आरोग्य केंद्रे आहेत. दिवसेंदिवस दिव्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत तेथे एकही आरोग्य केंद्र नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.ठामपाच्या हद्दीतील २६ लाख लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीसारख्या परिसरात राहणारी गोरगरीब आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या शहरी व ग्रामीण भागांतून येणाºया रुग्णांची संख्या आहे. त्यांच्यावरही येथे उपचार केले जातात. दरम्यान, पालिकेचे रुग्णालय आणि आरोग्य केंद्रात वर्षाला १० लाख २४ हजार रुग्णांची बाह्यरुग्णविभागात तपासणी होते. येथे ४५ हजार रुग्ण दाखल होतात. याशिवाय, ९ ते १० हजार प्रसूती होतात. या आरोग्य विभागातील २०० ते २५० डॉक्टरांपैकी ३० डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याने वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागावर कळतनकळत ताण येत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या आरोग्यसुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:46 AM