ठाणे : गेली सलग आठ वर्षे अभिनय कट्ट्यासाठी संकेतने स्वतःला वाहून घेतले होते.विविध, मालिका, सिनेमे, जाहिरातींमध्ये काम करत असताना देखील त्याने अभिनय कट्ट्याशी नाळ तुटू दिली नाही. केवळ अभिनयचं नाही तर संकेतच लिखाण देखील उच्च दर्जाच होतं. त्याच्या विनोदाला एक दर्जा होता.संकेतच अभिनयातील टायमिंग अफलातुन होतं. पण यावेळी मात्र त्याने लवकर एक्सिट घेतली आणि आम्हाला पोरकं केलं अभिनय कट्ट्याचे आयोजक किरण नाकती यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.
अभिनेता म्हणून संकेतची ओळख सगळ्यांच होती.मात्र त्याचे लिखाण हि लोकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने अभिनय कट्ट्यातर्फे संकेतच्या लिखाणावर आधारित संहितांचे अभिवाचान रविवारी ठेवण्यात आले होते.हे सादरीकरण पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक तसेच संकेतचे नातेवाईक उपस्थित होते. यंदाचा हा ३९० क्रंचा कट्टा होता.
या कार्यक्रमात कदिर शेख-वैभव चव्हाण यांनी "अकबर बिरबल",संदीप पाटील-परेश दळवी यांनी "मराठी आमुची मायबोली", निलेश पाटील-आदित्य नाकती यांनी "जी एस टी" या द्वीपात्रींचे सादरीकरण केले.संकेत ने लिहिलेल्या वेडा, विदूषक,दगड्या या एकपात्रींचे देखील अभिवाचन झाले. आरती ताथवडकर यांनी संकेत साठी एक कविता वाचली.कविता एकताच प्रेक्षक भावुक झाले. या कट्ट्याचे निवेदन सुषमा रेगे यांनी केले.निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी संकेतच्या आठवणींना उजाळा दिला. संकेतच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि प्रामाणिक पणाची झलक त्याच्या प्रत्येक कामात दिसायची.एखादा विषय त्याच्या डोक्यात आला तर त्यावर तो सखोल अभ्यास करायचा.मुख्य म्हणजे कोणालाही न दुखावता अचूकपणे संकेत तो विषय लिखानातून मांडायचा,सुषमा रेगे यांनी संकेत बद्दलची आठवण सांगितली. याप्रसंगी संकेतच्या वडिलांच्या हस्ते "संकेत देशपांडे ग्रंथ संग्रहालय"चे उदघाटन करण्यात आले.संकेत लहानपणापासूनच हुशार होता,त्याचा सारखा नम्र मुलगा मी पहिला नाही. संकेत सारखा संकेतच होता या शब्दात संकेतच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात मनस्विनी थिएटर, डोंबिवली या संस्थेने ऋषिकेश तुराई लिखित व वैभव निमकर दिग्दर्शित "मानस" एकांकिकेचे सादरीकरण केले. माणसातला एकाकीपणा आणि निराशेमुळे निर्माण झालेला स्क्रिजोफेनिया आणि मग त्याला मिळालेले वेगळे वळण या एकांकिकेत पाहायला मिळाले.एकांकिका पाहताना प्रेक्षकांना सस्पेन्स थ्रिलर अनुभवण्यास मिळाला. याचे संगीत-सिद्धेश टेकाळकार,प्रकाश-ओंकार पाटील,रंगमंच व्यवस्था-स्नेहा वाडकर,पल्लवी गांधी,ऋषिकेश म्हामुणकर यांनी पाहिली.भाग्येश पाटील,भाग्यश्री जांभवडेकर,शैलेश चव्हाण या कलाकारांनी काम केले.अलोक कसबे याने सूत्रधार म्हणून काम पाहिले.