ठाणे : ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे उद्घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर, प्रमुख अतिथी उल्हास राणे, होपच्या अध्यक्षा डॉ. दीपा राठी, बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय परांजपे व अॅड. माधवी नाईक आदी उपस्थित होते. चर्चासत्र, व्याख्यान, सादरीकरणाने संमेलन रंगत आहे.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय संमेलन गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले आहे. राठी यांनी प्रास्ताविक केले तर काटदरे यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शेतातील पक्षी हे ई बुक आणि संमेलनाची ‘अग्निपंख’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उगावकर म्हणाले की, गावांचे शहरीकरण व शहरांचे महानगरीकरण झापाट्याने वाढत असून त्यामुळे त्या त्या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या वस्तीस्थानावर परिणाम होत आहे. शहरीकरण हे पक्ष्यांच्या विनाशाच्या मुळाशी येत आहे. माणसाच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे. असे असले तरी पक्ष्यांच्या काही जातींनी या शहरी वातावणास जुळवून घेत आपली जीवनपद्धती बदलली आहे. सततचा माणसांचा सहवासामुळे पक्ष्यांची माणसाबद्दलची भिती कमी होत चालल्याचे आढळून येत आहे. माणसाच्या जवळ जाण्याची लक्ष्मणरेषा पक्ष्यांनी आखून घेतल्याचे आढळते. निरनिराळ््या प्रजातीमध्ये ती निरनिराळी असू शकते. उदा. पारवे किंवा कबुतरे हे जास्त जवळीक साधतात. सर्वसामान्यपणे ज्या पक्षीजाती शहरी पर्यावरणाशी जुळवून घेतात त्या सर्वसाधारणपणे मोठ्या आकाराच्या व म्हणूनच मोठ्या मेंदुच्या असतात. हे मोठ्या आकाराचे पक्षी माणसाच्या जास्त जवळ जातात, त्याचा मेंदू आकाराने मोठा असल्याने ते जास्त धोका पत्करु शकतात. यावेळी विशेष अतिथी राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, निसर्गातील जैवविवधतेचा अभ्यास करुन शहरांचे नियोजन आवश्यक आहे. निसर्गप्रेमींनी एकांगी पक्षी निरीक्षण करुन चालणार नाही तर पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नुसता अभ्यास नको तर पक्ष्याचा सखोल अभ्यास करण्याची सूचना सर्व पक्षी अभ्यासकांना केली. शहरी पक्ष्यांचा जीवनक्रम समजला तर पक्ष्यांचे संवर्झन होईल, तेवढेच नव्हे तर निसर्गातील जैवविविधतेचे संर्वधनही आपण करु शकू असे त्यांनी शेवटी सांगितले. त्यानंतर डॉ. आपटे यांनी गिधाड संवर्धन विषयावर सादरीकरण केले.
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या पक्षीमित्र संमेलनाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:10 PM
ठाण्यात दोन दिवस आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शहरी पक्षी आणि त्यांची जीवनपद्धती यावर आपले मनोगत व्यक्त केले.
ठळक मुद्दे३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे उद्घाटन संपन्न शेतातील पक्षी ई बुक आणि संमेलनाची ‘अग्निपंख’ या स्मरणिकेचे प्रकाशनडॉ. आपटे यांनी गिधाड संवर्धन विषयावर केले सादरीकरण