- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिकेत बहुमतात असतांना विरोधी बाकावर बसलेल्या भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी गुरवारी शहराचा झंझावती दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणच्या सहा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून कामाला लागण्याचा सल्ला पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असतांना, पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने, पक्षाची महापालिकेतील सत्ता गेली. सत्ता गेल्याचे खापर आमदार कुमार आयलानी यांच्यावर फोडण्यात येते. महापालिका सत्ता गेल्यावर पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत पुन्हा बळ आणण्यासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरवारी शहराचा झंझावती दौरा केला. त्यांच्या हस्ते गोल मैदानातील गार्डनच्या सुशोभीकरणाचे उदघाटन केले. तसेच तब्बल विविध ठिकाणच्या ६ संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले. पक्षाला उभारी देण्यासाठी संपर्क कार्यालय महत्वाची भूमिका वठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बंडखोरी केलेल्या भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांवर कारवाई करावी की नाही. हा पक्षांतर्गत भाग असल्याचे ते म्हणाले.
शहरात भाजपा व ओमी कलानी टीम यांची युती कायम असून यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे काम माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे शख्य झाले. महापौर पदाचा पहिला अड्डीच वर्षाचा टर्म संपल्यानंतर, महापौरांच्या दुसऱ्या टर्म वेळी भाजपातील ओमी कलानी टीमच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी केली. बंडखोर नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारा ऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. महापौर पाठोपाठ उपमहापौर, स्थायी समिती सभापती व परिवहन समिती सभापती पदी शिवसेना आघाडीचे उमेदवार निवडून आले. तसेच प्रभाग समिती सभापती पदावर ओमी टीम व शिवसेनेचे उमेदवार निवडून आणले.
ओमी कलानी यांचे आघाडी बाबत मौन
भाजपने स्थानिक ओमी कलानी टीम सोबत युती करून महापालिकेवर भगवा झेंडा फडकविला. मात्र विधानसभा निवडणूक उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नसल्याचा आरोप ओमी कलानी यांनी करून महापौर पदाच्या दुसऱ्या टर्म निवडणुकीत भाजप ऐवजी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे बहुमत असतांना भाजपची सत्ता पालिकेतून पायउतार झाली. पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी ओमी टीम सोबत आघाडी असल्याची कबुली दिली. मात्र या आघाडी बाबत ओमी कलानी यांनी मौन पाळले आहे.