ठाणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या ललित कला अकादमीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटनासाठी ज्येष्ठ कथ्थक नृत्यतज्ज्ञ डॉ. राजकुमार केतकर उपस्थित होते.
डॉ. पल्लवी नाईक संचालित कलाप्रांगण ट्रस्टमधील ज्येष्ठ नृत्य विद्यार्थिनींनी भरतनाट्यम् नृत्याचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे अपर्णा पेंडसे संचालित नृत्य छंदमधील ज्येष्ठ विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याची प्रस्तुती केली. पल्लवी व अपर्णा यांनी एकत्रितपणे गुरुवंदना सादर केली. शयेवलेकर संचालित वसंत बहार संगीत विद्यालयामार्फत तबला व बासरी या वाद्यांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. ललित कलांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची दीर्घ परंपरा आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध ललित कलांमध्ये प्रावीण्य मिळवून नामांकित झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात कलाकौशल्य विकासावर भर दिला आहे. या धोरणाला अनुसरून सरस्वती मंदिर ट्रस्टने सरस्वती ललित कला अकादमी नव्याने सुरू केली आहे. या उपक्रमात कलाप्रांगण ट्रस्ट, नृत्यछंद आणि वसंत बहार संगीत विद्यालय या सहयोगी संस्थांचा सहभाग असणार आहे. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या या ललित कला अकादमी कलाप्रांगण ट्रस्टच्या सहयोगाने भरतनाट्यम् नृत्य वर्ग सुरू होत आहेत, तर नृत्यछंद या संस्थेच्या सहयोगाने कथ्थकचे नृत्य वर्ग सुरू होत आहेत. वसंत बहार संगीत विद्यालयाच्या सहयोगाने संगीत व विविध वाद्यांचे वर्ग लवकरच सुरू होत आहेत. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी ललित कला अकादमीअंतर्गत भविष्यकाळात गरजेचे असणारे कला-कौशल्य विकासअंतर्गत भरतनाट्यम्, कथ्थक, गायन, विविध वाद्ये जशी तबला, बासरी, पेटी, गिटार, ढोलकी वगैरेचे वर्ग १ ऑगस्टपासून सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. भविष्यात हे सर्व वर्ग कला क्षेत्रातील अधिकृत नामांकित संस्थांबरोबर संलग्न करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी नमूद केले.