कल्याण : आंबिवली-शहाड रेल्वेस्थानकादरम्यान उभारलेल्या वडवली रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाची फीत न कापता थेट पुलावरून गाड्यांचा ताफा नेत लोकार्पण केले.
लोकार्पण सोहळ्य़ास शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपिल पाटील आणि शिवेसना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते. पुलाच्या लोकार्पणास भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र, परिस्थितीचे भान ठेवत पालकमंत्र्यांनी पुलाची फीत न कापताच त्यावरून गाड्यांचा ताफा नेत यु-टर्न मारून ते पुन्हा कल्याण-मुरबाड रोडवरील वालधुनी पुलाचे लोकार्पण करण्यास पोहोचले. तेथेही त्यांनी फीत कापली नाही. केवळ कोनशिलेचे अनावरण करून पुलाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.
पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, वडवली पुलाची लोकांची मागणी होती. काही कारणास्तव त्यात विलंब झाला. पूल खुला झाल्याने आता येथील रेल्वे फाटक बंद होणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना फाटकामुळे होणारा विलंब टळणार आहे.
वडवली पुलाच्या लोकार्पणानिमित्त पुलाच्या कडेला शिवसेना-भाजपने झेंडे लावले होते. एकापाठोपाठ लावलेले झेडे पाहता दोन्ही पक्षात श्रेयवादासाठी असलेली चढाओढ दिसून आली. आमदार चव्हाण यांनी सांगितले की, ‘वडवली पुलाच्या काम सुरू झाले, तेव्हा शिवसेना-भाजप युती होती. त्यामुळे वडवली पुलाच्या कामात भाजपनेही पाठपुरावा केला आहे.’
दरम्यान, शिवसेना-भाजप यांच्या आजच्या घडीला विस्तव जात नसल्या तरी वडवली पुलाच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे खासदार-आमदार एकत्रित आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
------------
अधिक भाष्य करणे योग्य नाही
सचिन वाझेप्रकरणी पालकमंत्री शिंदे यांना विचारले असता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने त्यावर अधिकचे भाष्य करणे योग्य नाही.
-------------