नितिन पंडीत
भिवंडी - कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध लादले असतानाही गणेश भक्तांचा उत्साह काकणभर ही कमी झाला नसून या गणेशोत्सवा निमित्त आरोग्य उत्सवाचे आयोजन करीत एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या गेलेल्या धामणकर नाका मित्र मंडळा तर्फे आपला पारंपारीक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. युट्युबच्या माध्यमातून गणेश दर्शन सोहळ्याचा शुभारंभ आर एस एसचे माजी भिवंडी शहर संघचालक त्रैलोकचंद जैन यांच्या शुभहस्ते आर एस एसचे पदाधिकारी राजेश कुंटे, विजय वल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
मागील वर्षी गणेशोत्सव दरम्यान कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तब्बल दहा दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यानंतर या वर्षी रक्तदान शिबिरासह नेत्र चिकित्सा, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वितरण, आरोग्य तपासणी सह अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था गणेश मंडपात करण्यात आली असून भिवंडी शहरातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम स्मृती चित्रकला स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शुभारंभ प्रसंगी दिली आहे.
सर्व शासकीय निर्बंधांचे पालन करीत धामणकर नाका मित्र मंडळाच्या वतीने डिजिटल लाईटच्या माध्यमातून गणेश सजावट देखावा उभारण्यात आला असून गणरायाचे दर्शन गणेश भक्तांना युट्युब फेसबुक व सॅटेलाईट केबलच्या माध्यमातून घडविले जाणार असल्याची माहिती धामणकर नाका मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष एम शेट्टी यांनी दिली आहे.