ठाणे : मराठी उद्योजकांसाठी संवादाचे व्यासपीठ उभे करणाºया मराठी बिझनेस एक्स्चेंजचे (एमबीएक्स) दुसरे पर्व ९ आणि १० नोव्हेंबरला ठाण्यात पार पडणार असून मसाला किंग म्हणून परिचित असणारे धनंजय दातार यांच्या हस्ते त्याचे उद््घाटन होणार आहे.ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणाºया या परिषदेद्वारे उद्योजकांसाठी त्यांच्या क्षेत्रात नेटवर्किंग उपलब्ध करून देणे आणि प्रदर्शनाद्वारे उद्योगांतील नव्या प्रवाहांची माहिती दिली जाणार आहे.धडाडीचे उद्योजक, आंतरराष्ट्रीय पातळीवर मसाला किंग अशी ख्याती मिळवणारे डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते गुरुवार, ९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता एमबीएक्सचे उद््घाटन होणार आहे. अपार कष्टातून एखादा मराठी उद्योजक आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कसे कोरू शकतो, याचा वस्तुपाठ यातून देण्याचा आयोजकांचा हेतू आहे. बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधील डॉक्टरेटची पदवी मिळवणाºया दातार यांनी दुबईतील छोट्या धान्याच्या दुकानापासून सुरू केलेला प्रवास आता आखाती प्रदेशातील ३८ रिटेल स्टोअर्सच्या साखळीपर्यंत पोहोचला आहे. संयुक्त अरब अमिरात, बहारीन, सौदी अरेबिया आणि भारतातील आघाडीच्या सुपरमार्केट साखळीत त्यांचा समावेश होतो. फोर्ब्स बेस्ट इंडियन सीईओ अॅवॉर्ड, द अरेबियन बिझनेस- इंडियन इनोव्हेटर सीईओ अॅवॉर्ड, आंत्रप्रेनर मॅगझिन्स बेस्ट इंडियन रिटेलर अॅवॉर्ड, द ग्लोबल अॅवॉर्ड फॉर परफेक्शन- क्वालिटी अॅण्ड परफॉर्मन्स, इंटरनॅशनल स्टार फॉर लीडरशिप इन क्वालिटी आणि बेस्ट एंटरप्रायजेस अॅवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी धनंजय दातार यांना गौरवण्यात आले आहे. उद््घाटनानंतर त्यांच्या मनोगतातूनच त्यांची यशोगाथा उलगडेल.
मसाला किंग दातार करणार उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:17 AM