पंकज पाटील, बदलापूर: बदलापूररेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच नव्याने विकसित होणाऱ्या बदलापूर स्थानकाच्या 36 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज बदलापुरात होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून होम प्लॅटफॉर्मच्या अर्धवट अवस्थेतील कामनबाबत विरोधक चर्चा करीत असताना विरोधकांना न जुमानता दानवे यांनी होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. तसेच बदलापूर स्थानकात सुरू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. दानवे हे बदलापुरात येणार असल्याने त्यांना विरोधकांनी काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रेल्वे स्थानकाच्या दिशेने आले होते. मात्र स्थानकात पोहोचण्याआधीच पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले चौकट: प्रवाशांनी मारल्या रेल्वे रुळावर उड्या: होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनासाठी दानवे बदलापुरात येणार असल्याने त्यांच्या येण्याआधी काही वेळासाठी होम प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी बंद करण्यात आले होते.
तसेच होम प्लॅटफॉर्मवर अर्थात एक नंबर प्लॅटफॉर्मवर येणारी बदलापूर लोकल आज दोन नंबर फलाटावर थांबवण्यात आली. अचानक बदलापूर लोकल दोन नंबरवर थांबल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण लोकल बदलापूर स्थानकात रिकामी झाल्याने स्थानका बाहेर पडण्यासाठी पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. स्थानकात गर्दी वाढत असल्याने रेल्वे सुरक्षा बलाचे जवान देखील काही काळासाठी तणावात आले होते. स्थानकात चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाल्याने सर्व सुरक्षा बलाचे कर्मचारी प्रवाशांना संयम बाळगण्याचा सल्ला देत होते. स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन काही प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावर उडी मारून होम प्लॅटफॉर्म मार्गे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांना रोखणे देखील रेल्वे सुरक्षा बलाला शक्य झाले नाही.