भिवंडी - कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली पाहिजे असे निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील माझी इ शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली.शनिवारी भिवंडीतील काल्हेर जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,जिल्हा परिषद ठाणे व राज्य शासनाच्या समग्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह एल अँड टी,प्रथम फाउंडेशनचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मातृभाषेतून शिक्षण ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणल्याने आता विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे. इंजीनियरिंग व मेडिकल मधील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असून इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडा देखील हळूहळू कमी होणार असल्याचे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले.विदेशातील नागरिकांना मातृभाषेवर प्रेम असल्याने अनेक देशांमध्ये स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ही राष्ट्र शिक्षणात व आर्थिक सुबत्त्यात अग्रेसर असल्याचे मत देखील केसरकर यांनी व्यक्त केले.
स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचे असून शाळांना सॅटॅलाइटवर जोडण्यात येणार असल्याने आदिवासी व दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर होणार असून शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲप वर संग्रहित होणार असल्याची टेक्नॉलॉजी देखील लवकरच राज्यात विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.