मीरारोड- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळेची उभारणी करणारी मीरा भाईंदर ही राज्यातली एकमेव महानगरपालिका असून सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्याचे लवकरच लोकार्पण करून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली जाईल अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी जागतिक दिव्यांग दिन निमित्त गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी दिली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिका समाजविकास विभाग व शिक्षण विभाग यांच्यावतीने नगरभवन येथील सभागृहात इयत्ता १० वी व १२ वी मध्ये यश मिळवणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी आयुक्त दिलीप ढोले, अतिरीक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवी पवार, प्राचार्य भरत पवार, जिल्हा समन्वयक अनिल कुऱ्हाडे, अधिव्याख्याता निशिगंधा चौधरी, समाजविकास विभाग व शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
१० वीच्या ४४ आणि १२ वीच्या २० उत्तीर्ण गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांना बॅग व कॅलक्युलेटर देऊन गौरव करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या दिव्यांग विद्यार्थ्यांचे मानसिक मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने हा सोहळा आयोजित करण्यात आला. महानगरपालिका दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सदैव कार्यरत राहील . महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी महानगरपालिका विविध कल्याणकारी योजना राबवत असते. त्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले.