ठाणे : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उप्रकमा अंतर्गत ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या वॉटर फ्रन्ट अर्थात चौपाटी विकसित करण्याच्या प्रकल्पातील कोपरी आणि कळवा चौपाटींचे लोकार्पण तसेच ठाणेकरांचा स्वस्तात गारेगार प्रवास व्हावा या उद्देशाने परिवहनमध्ये दाखल झालेल्या २० सीएनजी आणि ११ इलेक्ट्रीक बसचे औपचारीक लोकार्पण तसेच ठाणे स्टेशन भागातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या गावदेवी भुमीगत पार्कींग प्लाझासह कळवा रुग्णालयातील लेबर वॉर्ड,ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान आणि वागळे इस्टेट येथील वाहतूक बेटाचे लोकापर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरवातीला कोपरी येथे चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडप पूजन करण्यात आले. त्यानंतर कोपरी येथील चौपाटीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेकांनी शिंदे यांच्या सोबत सेल्फी काढल्या. यानंतर गावदेवी येथील भुमिगत पार्कींग, कळवा येथील चौपाटींचे लोकार्पण करून त्यांनी कळवा हॉस्पिटल मधील लेबर वॉर्ड, वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्र याचे लोकार्पण केले. पुढे ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान त्यांच्या हस्ते खुले करण्यात आले. ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ११ इलेक्ट्रीक आणि २० सीएनजी बस देखील शिंदे यांच्या हस्ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या. या शिवाय वागळे येथील रोड नंबर २२ येथील वाहतूक बेटाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. तर शहरातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन हे त्यांच्या हस्ते करण्यात आले.
उपोषण मागे
कोपरी सिद्धार्थ नगर भागातील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी आपल्या हक्कांच्या घरांसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू केले होते. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रहिवाशांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर त्यांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडायला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर या रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.