ठाणे : चालकांसाठी जीवघेणा ठरलेल्या मुंब्रा बायपाससह रेल्वेलाइनवरील पूल सुमारे चार महिन्यांपासून बंद होता. दुरुस्तीसाठी बंद ठेवलेल्या या रस्त्यावरील दुभाजकाच्या कामासह दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अद्याप जाळ्याही लावल्या नाहीत. मात्र, सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊन मुंब्रा बायपास सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयालाही आता भारत बंदचे ग्रहण लागून उद्घाटन सोहळा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडला आहे.मुंबईसह राज्यात सर्वाधिक वाहतूककोंडी ठाणे जिल्ह्यात होत असल्याचे वास्तव आहे. मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ठाणे शहरास लागून असलेल्या मुंब्रा बायपासचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रात्रंदिवस अवजड वाहनांकडून मोठ्या प्रमाणात वापर असलेला हा मुंब्रा बायपास व त्यावरील रेल्वे पूल चार महिन्यांपासून बंद आहे. ऐन पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने अतिवर्दळीच्या घोडबंदर रोडसह नाशिक, आग्रा, एक्स्पेस, एलबीएस, माळशेज आदींसह पुणे महामार्ग, उरण, जेएनपीटी आणि कोकणात जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. या प्रदीर्घ कालावधीनंतरही मुंब्रा बायपासवरील दुरुस्तीचे काम पूर्णपणे संपलेले नाही. मात्र, लोकांची गैरसोय विचारात घेऊन १० सप्टेंबर रोजी या बायपासचे उद्घाटन घाईगडबडीत करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील बायपासची पाहणी करण्यासाठी येणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही पाहणी केल्यानंतर ते बायपासचे उद्घाटनही करणार होते. मात्र, महागाईविरोधात सर्वपक्षीयांनी सोमवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. चंद्रकांत पाटील यांचा दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.बायपासवर दरडी कोसळण्याची भीती असलेल्या डोंगरकड्यावर बहुतांश ठिकाणी जाळ्या लावायच्या बाकी आहेत. रस्त्यांच्या कडेला वाळू, मातीचे छोटेमोठे ढीग असून बºयाच ठिकाणी रस्ता दुभाजक बांधलेले नाही. खाली झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लोखंडी पट्ट्यांचे काम अपूर्ण असून दुभाजकांची कामेही झाली नाहीत. रस्त्यावर डागडुजी केलेल्या ठिकाणी दुभाजक बांधण्याऐवजी त्यास सळयांचे कुंपण घालून ठेवले आहे. डांबरीकरण अर्धवट आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी गॅसच्या साहाय्याने काम सुरू होते.>बांधकाम साहित्य जागोजागी पडूनरेल्वे पुलावरील दुभाजकाचे कामही अपूर्णच आहेत. पुलावर टाकाऊ मटेरियल पडून आहे. डांबरीकरणाचे काम नुकतेच सुरू केले असून काही ठिकाणी गरज असूनही हे काम केलेले नाही. रेतीबंदरपासून ते कौसा, शीळ, डायघर आदीपर्यंतच्या बायपासवर ठिकठिकाणचे काम अर्धवट आहे. ड्रम, मिक्सर, पत्रे, गॅसकटर, रेती, खडी, मातीसह संपूर्ण यंत्रसामग्री या बायपासवर ठिकठिकाणी आहे.
उद्घाटनाला भारत बंदचे ग्रहण, दुरुस्तीसाठी चार महिन्यांपासून होता बंद, अद्याप काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 3:16 AM