सदानंद नाईक, उल्हासनगर: संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या असून मद्रासी पाड्यातील ७ ते ८ जणांच्या घरात नाल्याचे पाणी घुसले. तर वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सतर्कतेचा इशारा महापालिकेने दिला आहे.
उल्हासनगरात पहाटे पासून संततधार पाऊस सुरू असून कॅम्प नं-४ येथील मद्रासी पाड्यात सकाळी नाल्याचे पाणी तुंबून ७ ते ८ जणांच्या घरात पाणी घुसले. महापालिकेने मशिनद्वारे पाण्याचा उपसा केला. महिलांनी नाल्यावरील अवैध बांधकामामुळे पाणी तुंबून घरात घुसल्याचा आरोप केला आहे. महापालिकेने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी दिली. तर गोलमैदान, शांतीनगर, आयटीआय कॉलेज, गुलशननगर येथील राहुलनगर आदी सखल भागात पावसाचे पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात एक झाड पडल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख यशवंत सगळे यांनी दिली. तसेच रेणुका सोसायटी गुलशन टॉवर्स भागात विषारी घोणस जातीचा साप मिळून आला असून सापाला अंबरनाथ जंगलात सोडून देण्यात आले. शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदी किनाऱ्यावरील काही घरात पाणी घुसले. तसेच नदी किनाऱ्यावरील नागरिकांना महापालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले. असाच पाऊस सुरू राहिल्यास नदी किनाऱ्यावरील घरात पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे.