शाम धुमाळ, कसारा: कसारा व परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे आज संध्याकाळच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्ग वरील नवीन कसारा घाटात ब्रेक पॉईंट जवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळली .परिणामी या मुळे घाटातील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
आज सततच्या पावसामुळे कसारा घाटात दोन्ही मार्गिकेवर लहान मोठ्या दरडी खाली रस्त्या वर येत असल्याची माहिती वाहन चालकाकडून आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळाली. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के.डी कोल्हे व कर्मचारी यांनी घाटात जाऊन पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने महामार्गावरील छोटे दगड बाजूला केले. नंतर संध्याकाळी पुन्हा नवीन घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. सुदैवाने या वेळी महामार्गावर एकही गाडी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
परिणामी अचानक पडलेल्या दरडी मुळे नाशिक हून मुंबईकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. पडलेल्या महाकाय दरडी च्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन टीम,कसारा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी सुरक्षा कडे तयार करीत वाहंचालकांना सावध केले. यानंतर घोटी टोल प्लाझा कंपनी कडून दरड हटवण्या साठी जेसीबी सह यंत्रणा आल्या नंतर महामार्ग पोलिसाच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता दरडी महामार्गा वरून दूर करण्यात आल्या.