ठाणे : मुलीला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी रघुनाथनगर येथील सासरी आलेल्या विवाहितेला सासूने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सासूसह पतीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी पहाटे त्यांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.ठाण्यातील रघुनाथनगर येथे राहणारी दक्षा मांगे (३०) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीत, लग्न झाल्यापासून तिची सासू जमनाबेन मांगे (७१) आणि पती अशोक (४०) हे दोघेही तिला कोणत्याही कारणावरून मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच साधारण दोन ते अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्यात झालेल्या वादावरून त्या दोघांनी तिला मारहाण केली होती. त्यातून ती घाटकोपरला आईकडे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, मुलगी दिशा हिला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी शुक्रवारी १३ एप्रिल २०१८ रोजी ५ वाजता पतीच्या घरी रघुनाथनगर वागळे इस्टेट येथे आली होती. त्या वेळी सासू जमनाबेन यांनी विनाकारण भांडण करून बेडरूममध्ये सर्टिफिकेट घेण्यासाठी गेल्यावर हात धरून, खेचून स्वयंपाकघरात आणून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये ती ८० टक्के भाजल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या प्रकरणी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर सासू-पती या दोघांना अटक केली आहे, तसेच शनिवारी न्यायालयात हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्यांना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठाण्यात विवाहितेला रॉकेल ओतून पेटविले, रघुनाथनगर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 2:47 AM