ठाणे : नाशिक येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारकारने गोल्डन डाईज क्राँस सर्कलजवळ गुरुवारी रात्री अचानक पेट घेतला. मात्र, बंदोबस्तावरील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एक रेडिमिक्स सिमेंट काँक्रिटची गाडी थांबवून त्यातल्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली. गाडीतील मौल्यवान सामानही त्यामुळे सुरक्षित राहिले. या कामगिरीबद्दल वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
नाशिक येथून घोडबंदर च्या दिशेने एक मोटारकार गुरुवारी रात्री ८ वाजता च्या सुमारास येत होती. गोल्डन क्राँस परिसर ओलांडत असताना अचानाक या कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे भेदरलेल्या सौरभ सिंग यांनी गाडी थांबवली. त्यानंतर सिंग दांम्पत्य तातडीने गाडी बाहेर पडले. दुस-या क्षणी या गाडीने अचानाक पेट घेतला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस हवालदार श्रीकांत वानखेडे, भोये आणि राठोड यांनी पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी समोरच्या रस्त्यावरून जाणारे बीटकाँन कंपनीचे रेडी मिक्स सिमेंट काँक्रिटचे वाहन थांबविले. काँक्रिट मिक्स करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या सहाय्याने त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या गाडीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली एक बँग होती. गाडीने पूर्ण पेट घेण्यापूर्वीच आग आटोक्यात आल्यामुळे मौल्यवान साहित्याची ती बँगही सुरक्षित राहिली. त्यानंतर पोलिसांनीच क्रेनच्या सहाय्याने ही गाडी गँरेजपर्यंत पोहोचविली.सिंग दांम्पत्याने मदतीस धावून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पोलीस उपायुक्त पाटील तसेच कापूरबावडी उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. जी. लंभाते यांनी वानखेडे, भोये आणि राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. उपायुक्त पाटील यांच्या कार्यालयात या कर्मचाऱ्यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला.