अंबरनाथ : एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यात या बाळाचा मृत्यू झाला असून, यानंतर पोलिसांनी अविवाहित बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतले आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स फेज-२ मधील डी-विंगमध्ये ही घटना घडली. इमारतीत एक तरुणी तिच्या आईसह राहत होती. रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूममधून इमारतीच्या डक्टमध्ये तिला फेकून दिले.
सकाळी ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला.
तर या बाळाची आई आणि आजी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेले हे बाळ नको असल्यानेच त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.
पडघ्यात एनआयएची तपासणी मोहीम
पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील बोरीवली गावात पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्थानिक पडघा पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. यावेळी एनआयएच्या अटकेत असलेल्या साकिब नाचन याच्या घरासमोर आधीच त्याच्या गुन्ह्यासंदर्भात माहिती देणारा फलक लावला आहे.
एनआयएने यापूर्वीही ५ ऑगस्ट २०२३ रोजी बोरीवलीमधून नाचन याला अटक केली होती. त्यानंतर ९ डिसेंबर २०२३ रोजी बोरीवली गावातील ५० तरुणांना ताब्यात घेऊन यापैकी १५ जणांना देश विरोधी कटात सहभागी असल्याच्या आरोपात अटक केली होती. यात बोरीवली उपसरपंच फरहान सूसे याचाही समावेश होता.