भिवंडी: महाराष्ट्र शासनाने यंत्रमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प उभे करण्यास घेतले आहेत. त्यामध्ये इचलकंरजी पॉवरलूम मेगा क्लस्टर लि.प्रकल्पाला सामूहिक प्रोत्साहन योजनें अंतर्गत स्थापन केले जाणार आहे. परंतु या मध्ये महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहराचा समावेश करावा असे निवेदन भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायिकांच्या हलारी पॉवरलूम असोसिएनचे अध्यक्ष चंदुलाल सुमरिया,भिवंडी पावरलूम मजुरी भीम चालक असोसिएशनचे कार्यवाहक अध्यक्ष तिरुपति सिरिपुरम,पंचवार्षिक वस्रोद्योग धोरण समितीचे सदस्य राजेंद्र वासम,तलकोकुल अशोक, गड्डम लक्ष्मण या शिष्टमंडळाने राज्य शासनाकडे केली आहे.
राज्यातील पॉवरलूम उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजीसाठी पॉवरलूम मेगा क्लस्टर लि.या प्रकल्पाला सामूहिक प्रोत्सहन योजनेंतर्गत विशाल प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.या प्रकल्पामध्ये वस्त्रोद्योग घटकाने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग धोरणांतर्गत भांडवली अनुदान देणे, सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत पात्रता तपासून विशाल प्रकल्पाचा दर्जा देणे, त्याकरिता संबंधित घटकांकडुन आवश्यक ते कागदपत्र जमा करून घेणे आणि वस्त्रोद्योग विभागाचा समन्वयाने अभ्यास करून पंधरा दिवसात उच्चाधिकार समितीला या बाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.सदरची ही योजना महाराष्ट्रातील लाखो यंत्रमागधारकांना दिलासा देणारी आहे.परंतु सदरची योजना फक्त इचलकरंजी या शहरासाठी मर्यादित केल्यामुळे भिवंडी येथील असंख्य यंत्रमागधारकांवर अन्याय होणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भिवंडी हे वस्त्रोद्योगातील महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात मोठे यंत्रमाग केंद्र आहे आणि जगभरात भारताचा मँचेस्टर म्हणून ओळखला जात आहे. असे असतांना भिवंडी शहराला या योजनेत समाविष्ट न केल्याने येथील सर्व यंत्रमागधारकांवर अन्याय करण्यासारखे होणार असल्याची भावना भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.