मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेसाठी सूर्या पाणी पुरवठा योजनेतून २१८ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असून सदर योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी करतानाच तांत्रिक तपासणी शुल्काची ४ कोटी ९४ लाखांची रक्कम एमआरडीएच्या योजना खर्चात समाविष्ट करावी अशी मागणी आमदार गीता जैन यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनां बाबत ४ फेब्रुवारी रोजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन विभाग, ठाणे येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत आ. गीता जैन यांनी मीरा भाईंदर शहराच्या पाणी समस्या व पाणी योजनां बाबत निवेदन दिले.
गेल्या अनेक वर्षां पासून सूर्या पाणी पुरवठा योजना रखडली असून ह्या योजनेतून शहराला २१८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होणार आहे . जेणे करून शहरातील नागरिकांची पाणी समस्या कामयमची संपुष्टात येणार आहे . शहरासाठी हि योजना महत्वाची असून अंतर्गत वितरणासाठी जलवाहिन्या टाकणे , जलकुंभ उभारणे आदी काम महापालिकेचे आहे .
त्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने तयार केलेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत तांत्रिक तपासणी अहवाल शुल्क म्हणून ४ कोटी ९४ लाख रुपये महापालिकेस भरण्यास सांगण्यात आले आहे . पालिकेने २५ लाख रुपये अडा देखील केले आहेत . परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सदरची रक्कम एमआरडीएच्या मूळ योजनेच्या खर्चात समाविष्ट करावी अशी मागणी आ . गीता यांनी केली . त्यावर मंत्री गुलाबराव यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे आ. गीता यांनी म्हटले आहे. शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळा कडून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्या मुळे शहरातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही . जेणे करून पाणी टंचाई भेडसावते . त्यावर लवकरच पाणी पुरवठा व मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिल्याचे आ. गीता जैन म्हणाल्या