ठाणे : ठाणे महापालिकेच्या थीम पार्क प्रकरणाला रोजच कलाटणी मिळत आहे. आयुक्तांनी ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला असतानाच आता या कामाची निविदा ठरावीक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून तयार केल्याचे निरीक्षण लोकप्रतिनिधींच्या चौकशी समितीने नोंदवले आहे. वित्तीय मान्यता नसतानाही संबंधित खात्याने प्रकल्पाची अंमलबजावणी केली आणि त्यास लेखा विभागाने मान्यता दिल्याचे समितीने नोंदवले आहे.
‘थीम पार्क’मुळे झालेले नुकसान प्रशासनाने ठेकेदार आणि संबंधित देयक मंजूर करणाºया अधिकाºयांकडून कायदेशीररित्या वसूल करण्याची शिफारस समिती करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. घोडबंदर भागात उभारलेल्या ‘जुने ठाणे-नवीन ठाणे’ या थीम पार्कच्या कामासाठी १६ कोटी ३५ लाखांचा ठेका दिला होता. प्रत्यक्षात मात्र या कामाचे मुल्यांकन दहा कोटी ९५ लाख रु पये असल्याचे प्रशासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या चौकशीतून समोर आले होते. त्यामुळे ठेकेदाराच्या बँक गॅरंटीसह अनामत रक्कम जप्त करणे आणि संबंधित अधिकाºयांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींच्या चौकशी समितीची बैठक झाल्यानंतर आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. या प्रकल्पासाठी महापालिका निधीतून खर्च करण्याकरिता महासभेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे वित्तीय मान्यता नसतानाही संबंधित खात्याने प्रकल्पाची अंमलबजावणी केली आणि त्यास लेखा विभाग व लेखा परीक्षण विभागाने मान्यता दिली, असे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. या प्रकल्पाच्या निविदेमध्ये पेंटिंग, साचा तयार करून फायबर मटेरियलमध्ये काही मॉडेल्स फोटोप्रमाणे तयार करणे, इलेक्ट्रिक, सिव्हिल आणि लॅण्डस्केपिंगची कामे करणे, यासाठी फिल्म डिझायनर किंवा ज्येष्ठ कला दिग्दर्शक असण्याची अट घालण्यात आली होती. निविदेत या दोन्ही अटी ठराविक ठेकेदारासाठीच घालण्यात आल्याचा आक्षेप समितीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकरयांनी दिली.आक्षेपांवर राष्टÑवादी-भाजपाचे एकमतदुसरीकडे २० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या महासभेत चर्चेशिवाय प्रकरणे मंजुर करू नयेत अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सभागृह नेत्यांनी प्रस्ताव मंजूर केले. त्यात या प्रकल्पाचाही समावेश आहे. तसेच स्थायी समितीत आयत्यावेळच्या विषयामध्ये जुने ठाणे, नवीन ठाणे प्रकल्पाच्या खर्चास सदस्यांना माहिती न देताच ही मंजुरी दिल्याचे आक्षेप आहेत. यावर राष्ट्रवादी, भाजपाचे एकमत, तर शिवसेनेचा विरोध असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.