भिवंडी -राज्यात पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण बनविण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती मध्ये भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख,यांसह वस्त्रोद्योग व्यवसायीक भाजपा मंडळ अध्यक्ष राजेंद्र वासम,पुनित खेमसिया यांचा समावेश राज्य शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून विशेष शासन निर्णय जाहीर करून नियुक्ती करण्यात आली आहे .
राज्याचे सन २०२३ - २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी नविन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यासाठी सध्या राज्यातील वस्त्रोद्योगाच्या गरजा तसेच वस्तुस्थीती यानुसार नविन वस्त्रोद्योग धोरण बनवीत असताना वस्त्रोद्योगाशी संबंधित तज्ञ तसेच या क्षेत्रातील अन्य अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करून शिफारसी विचारात घेण्याकरीता सदर तज्ञ तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित माहितगारांकडून उपयुक्त सल्ले विचारात घेऊन शासनास शिफारसी सादर करण्याकरीता वस्त्रोद्योग आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समावेशक समिती गठीत करण्यात आली असल्याचे वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव विशाल मदने यांनी शासन आदेशात स्पष्ट केले आहे .
भिवंडीला कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते मात्र शासनाच्या निधी व धोरणांचा फायदा या उद्योगाला हवा तसा झालेला नाही या समितीत आपली नियुक्ती झाल्याने भिवंडीसह राज्यातील वस्त्रउद्योगास चालना देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.