उल्हासनगर : महापालिकेच्या काही ठेकेदाराच्या घरी व कार्यालयावर गेल्या दोन दिवसापासून आयकर विभागाने धाडसत्र सुरू आहे. भाजप, रिपाइंच्या टेंडरवार आरोपामुळे ठेकेदारासह महापालिका अधिकारी व दलाल यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत कोट्यवधी किमतीचे ठेके घेणाऱ्या जयहिंद कन्स्ट्रक्शन, जय भारत कॉन्स्ट्रक्शन, झी अँड पी आदी कंपनीच्या कार्यालय व घरावर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता आयकर विभागाने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. गेल्या दोन दिवसांपासून कागदपत्रांची तपासणी सुरू असून मोठा घोटाळा उघड होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. या कंपन्या कोट्यवधींचा निधीतून विकासाची कामे करीत आहेत. यापूर्वीही दिवाळी दरम्यान काही बिल्डरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. मात्र छापेमारीनंतर त्यांच्यावर काय कारवाई झाली. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान भाजपा आमदार कुमार आयलानी व शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी शहरातील विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे करून १०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. मात्र त्यानंतर काय कारवाई महापालिकेने केली. तेही थंड बासनात पडून आहे.
शहरात ४२६ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, १५० कोटीच्या निधीतील एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते, ४२ कोटीच्या निधीतील विविध विकास कामे, २९ कोटींची मूलभूत सुखसुविधा योजना आदी अनेक विकास कामे सुरू आहेत. या हजारो कोटीच्या विकास कामात अनियमितता असून मोठा घोटाळा झाल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहे. शहरातील मूलभूत सुखसुविधेसाठी १५८ विकास कामासाठी ४२ कोटीच्या निधीतून निविदा काढली. याकामातून ठेकेदारात वाद निर्माण झाला असून यातूनच टेंडरावर घोटाळ्याचा आरोप होऊन विकास कामावर प्रश्नचिन्हे निर्माण झाले. कामे।झाली की नाही. याबाबतची कोणतीही पडताडणी न करता, कोट्यवशीचे बिले काढल्याची चर्चाही शहरात रंगली असून विकास कामे झाले का? याबाबतच्या चौकशीची मागणीही सर्व स्तरातून होत आहे.