ठाणे : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या या कालावधीत पैशांचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालून संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी पुणे आयकर विभागाने आता नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. त्याद्वारे व्यवहारांवर लक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी हे विशेष नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. स्थापन केलेला हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस २४ तास कार्यरत असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती, तक्रारी देण्यासाठी नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. हा कक्ष ठाणे जिल्ह्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी कार्यान्वित राहणार आहे.
त्यासाठी टोलफ्री संपर्क क्रमांक - १८००-२३३०३५३, २३३०३५४, व्हॉट्सॲप क्रमांक : ०४२०२४४९८४ आणि ईमेल आयडी-pune.pdit.inv@incometax.gov.in , यानियंत्रण कक्षाचा पत्ता : कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे येथे संपर्क साधून नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात, असे आवाहन शिनगारे यांनी केले आहे.