आसनगाव : शहापूर तालुक्यातील जवळजवळ १६५ गावातील प्रवासी आसनगाव रेल्वे स्थानकातून कल्याण, ठाणे, मुंबई येथे नोकरीनिमित्त प्रवास करतात. या स्थानकातील दैनंदिन महसुली उत्पन्न ५ लाखांच्या घरात आहे. मात्र, तरीही येथे प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा देखील मिळत नाहीत. स्थानक स्वच्छता राखण्याबाबत रेल्वे प्रशासन कमालीचे उदासीन आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांना या गोष्टी लक्षात आल्या.स्थानकातील पिण्याच्या पाण्याची टाकी नियमितरित्या साफ होत नाही. त्यामुळे यात गढूळ व दूषित पाणी आढळले. प्रवासी ते पित असतात. स्थानकातील शौचालये देखील अस्वच्छ आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी मोडकळीस आलेल्या खुर्च्या ठेवल्या आहेत. हात धुण्यासाठी असलेले बेसिन अस्वच्छ आहे. बेसिनखाली पाण्याचा निचरा करण्याची काही व्यवस्था नसल्याने पाणी साठून राहून मलेरिया तसेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. संपूर्ण फलाट घाणीने बकाल झालेला आहे. स्थानकाची ही दयनीय परिस्थिती पाहून संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी याबाबत ताबडतोब सिनियर डिसीएम नरेंद्र पनवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी देखील याची तातडीने दखल घेत याकडे ताबडतोब लक्ष दिले जाईल, असे सांगितले.रेल्वे प्रवाशांकडून भाडे वसूल करते, मात्र, त्यांना प्राथमिक सुविधा, रुंद ब्रीज, स्वच्छ फलाट, शौचालय सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्यासाठी चांगल्या खुर्च्या या किमान सुविधा देण्यातही चालढकल करते. या अन्यायकारक परिस्थितीला रेल्वे अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.
आसनगाव रेल्वे स्थानकात असुविधा, रेल्वे प्रशासन उदासीन : प्रवासी संघटनांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:04 AM