कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लसीकरण केंद्रे कमी आहेत. खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देत नसल्याचे कारण आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करता येईल असे नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने लसीकरण केंद्रे सुरू करावीत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनी दिला आहे. त्यासाठी प्रशासनाला हळबे यांनी चार दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
हळबे यांनी मंगळवारी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची भेट घेतली. या वेळी हळबे यांनी डॉ. पाटील यांच्याकडे विचारणा केली की, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरण जास्त प्रमाणात केले पाहिजे. महापालिकेने केवळ चार ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयांत आणि अन्य दोन केंद्रांत लसीकरणाची सुविधा दिली आहे. याव्यतिरिक्त महापालिका हद्दीत १० पेक्षा जास्त खाजगी रुग्णालये लसीकरण केंद्रे सुरू करू शकतात. मात्र, त्यांना परवानगी दिली नाही. त्यापैकी केवळ दोनच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही, अशी सबब वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून लसीकरणाचे लक्ष्य तातडीने पूर्ण करा, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या परवानगीअभावी खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करता येत नाहीत. या दुहेरी पेचात आरोग्य खाते आहे. केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने गर्दी होते. त्यातून रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, असा धोका हळबे यांनी व्यक्त केला आहे.
----------------------------------